( प्रतिनिधी / रत्नागिरी )
तालुक्यातील उमरे येथील तरुणाला कुरिअरच्या बहाण्याने जवळपास 1 लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना 31 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अनिल हरी सनगरे (40, रा. सी.एम.नगर, मनवेलपाडा, विरार इस्ट, पालघर, सध्या उमरे, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सनगरे हे मिऱ्या भाईंदर ठाणे येथे कंपनीमध्ये अकाउंंटंट म्हणून काम करतात. त्यांचे रत्नागिरी येथे मारुती कुरिअरमध्ये कुरिअर आले. मात्र हजर नसल्यामुळे ते परत गेले. आपले कुरिअर परत गेल्यामुळे सनगरे यांनी गुगलवर सर्च करुन मारुती कुरिअरचा पत्ता व नंबर शोधला आणि 7980374093 या नंबरवर कॉल केला. कुरिअरबाबत त्यांच्याशी चौकशी केली. 7980374093 वरुन एका अनोळखी व्यक्तीने सनगरे यांना फोन करुन सांगितले की, तुमचे गेलेले कुरिअर थांबवायचे असेल तर पाच रुपये पाठवा असे सांगितले. त्यानंतर सनगरे यांनी 5 रुपये पाठवले.
परंतु ते फेल गेल्याने अनोळखी व्यक्तीने पुन्हा सनगरे यांना एक लिंक पाठवली. ती लिंक सनगरे यांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्या वसई विकास सहकारी बँक विरारचे अकाउंटवरून पहिले 90 हजार रुपये गेले. त्यानंतर दोन मिनिटांनी पुन्हा 9 हजार रुपये गेले. असे एकूण 99 हजार रुपये अज्ञाताने ऑनलाईन काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सनगरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क), (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.