(चिपळूण / प्रतिनिधी)
गावागावांमध्ये असलेल्या देवराया म्हणजे पूर्वजांनी तयार केलेली पर्यावरणाची एक छोटीशी शाळाच होती. त्या देवराया तसेच जंगल वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन देवरायांच्या अभ्यासक आणि अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फौंडेशनच्या अध्यक्ष डॉ. अर्चना गोडबोले यांनी केले.
येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक धीरज वाटेकर यांनी डॉ. गोडबोले यांचा परिचय करून दिला.
जंगल आणि देवराया संवर्धनाचा २०११ चा क्लिटंन ग्लोबल इनिशिएटिव्ह सन्मान प्राप्त झालेल्या डॉ. गोडबोले तीस वर्षांहून अधिक काळ देवराया आणि जंगल वाचविण्याच्या मोहिमा राबवत आहेत. त्यांनी उत्तर सह्याद्रीत जंगल आणि पर्यावरण संरक्षणाचे काम केले आहे. त्यामुळे २४ गावांमधील ८ हजारांहून अधिक एकर जमिनीवरील जंगल संवर्धित झाले आहे. डॉ. गोडबोले यांनी आपल्या या संपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला आणि मुलांनी जंगल वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, आवड म्हणून पश्चिम घाटाचा अभ्यास करताना कोकणात मोठ्या प्रमाणावर देवराया असल्याची माहिती मिळाली. जंगलात हिंस्र श्वापदांपासून गुरांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना मरण पावलेल्या शेतकऱ्याच्या नावाने किंवा गावातल्या लोककथांच्या आधारे या देवराया तयार झाल्या. देवरायांमधील झाड तोडायचे नाही, असा पूर्वी संकेत होता. तेव्हा गावात मोठी मंदिरेही नव्हती. पण नंतर तयार झालेली मंदिरे मोठी करण्यासाठी देवरायांमध्येही मोठी जंगलतोड होऊ लागली. मुंबईकर चाकरमान्यांना गावातही छोटी मुंबई वसविण्याची म्हणजे आधुनिक सुविधा, सोयी निर्माण करण्याची इच्छा असते. त्यातून देवराईचा बळी जातो. मध्यंतरी सामाजिक वनीकरण विभागानेही अॅकॅशिया, निलगिरी अशा कोकणातील पर्यावरणाची हानी करणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यासाठी जंगलतोड केली.
विविध कारणांनी कोकणात झालेली देवरायांबरोबरच मोठ्या प्रमाणावर खासगी जंगले असलेल्या कोकणातील अन्य जंगलांची तोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेले यश, काही ठिकाणी आलेले वाईट अनुभव यांची माहिती डॉ. गोडबोले यांनी दिली. जंगल तोडायचे नाही, या अटीवर ठरावीक रक्कम देऊन ग्रामस्थांशी केलेल्या पंचवार्षिक कराराची माहितीही त्यांनी दिली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आतापर्यंत आठ हजार एकर क्षेत्राचे करार झाल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात शासनाची राखीव जमीन अत्यल्प आहे. बहुतेक जागा खासगी मालकीच्या असतात. त्यामुळे ही जंगले वाचविण्यासाठी असे करार केले गेले. या जंगलांमधून वाढीव उत्पन्न मिळावे, यासाठी हिरडा, बेहडा झाडांची लागवड करून प्रतिकिलो २२ रुपये दराने ती फळे विकावीत, अशी योजनाही राबविली जात असल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले. या साऱ्या प्रयत्नांपासून प्रेरणा घेऊन मुलांनी जंगल वाचविण्यासाठी, पर्यावरण वाचविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी संपूर्ण महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या यंत्रणा, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या समारोप समारंभानंतर जितेंद्र कांबळे यांनी संयोजन केलेला माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. मुंबईतील सिने-नाट्य कलाकार निखिल पालांडे यांचा त्यात सहभाग होता. रात्री नागावे येथील हभप सूर्यकांत पालांडे आणि पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदाय मंडळींनी हरिपाठ केल्यानंतर संपूर्ण महोत्सवाची सांगता झाली.