(नवी दिल्ली)
आयकर विवरण भरायचे राहून गेले असेल तर आता फक्त काही तास शिल्लक आहेत. पण जर भरायला चुकला असाल, तर मात्र १० हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो. ज्या करदात्यांनी काही कारणास्तव ३१ जुलै २०२२ पर्यंत आयटीआर दाखल केलेला नाही, त्यांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांचा आयटीआर भरू शकतात. आयकर विभागाने विवरण भरण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.
दरम्यान, आयटीआर भरण्यासाठी त्यांना आता ५ हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. तरीही त्यांनी आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी ही फी दुप्पट म्हणजेच १० हजार रुपये होईल. यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे ज्यांचे आयटीआर ऑडिट आवश्यक आहे, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा लोकांसाठी यामध्ये काहीसा दिलासा आहे.
ज्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांच्यासाठी विलंब शुल्कदेखील केवळ १००० रुपयांपर्यंत मर्यादित असेल. लक्षणीय बाब म्हणजे आयटीआर उशिरा भरल्यास केवळ विलंब शुल्कच नाही तर करावर व्याजही भरावे लागते. हे व्याज मासिक आधारावर आकारले जाते. आयटी कायद्यानुसार कराच्या रकमेवर १ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाऊ शकते, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
जर आयकरदात्याने वेळेत आयटीआर दाखल केला नाही तर आयकर विभागाला करदात्यावर नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या ५० टक्के इतका दंड आकारण्याचा अधिकार आहे. जर विभागाला वाटत असेल की, आयटीआर हेतुपुरस्सर दाखल केला गेला नाही, तर डिफॉल्टरला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, जर करचुकवेगिरीची रक्कम २५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर ३ महिने ते २ वर्षांच्या आत तुरुंगवास होईल.
पॅन-आधार लिंक
आयटीआर भरण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल तर तुम्ही आयटीआर दाखल करू शकणार नाही. आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीखही निघून गेली आहे, त्यामुळे तुम्ही आता हे काम केल्यास तुम्हाला यासाठी १ हजार रुपये दंडही भरावा लागेल. तुम्ही आयकर वेबसाइटवर आयकर रिटर्न भरण्यासोबतच पॅनला आधारशी लिंक करणेही आवश्यक आहे.