(मुंबई)
ज्या कंपन्यांना आधी अपात्र केले होते, त्यांनाच पात्र करून टीईटीची परीक्षा घेण्यात आली, तसे झाले नसते तर घोटाळा घडलाच नसता, हा सगळा घोटाळा मंत्रालय स्तरावर घडला असून याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मागच्या आठवड्यात राखून ठेवलेल्या टीईटी घोटाळ्याबाबत विषय दुस-या आठवड्याच्या कामकाजात दाखवण्यात आलेला नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मंत्र्यांच्या घरच्यांना लाभ देण्यात आला आहे. २१ डिसेंबरला हा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा अध्यक्षांनी प्रश्न नियमाच्या तरतुदीत बसत नसल्याने चर्चेला घेता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यावर उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यावर विरोधकांनी यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना टार्गेट केले. मंत्र्यांच्या घरातील मुली शिक्षक म्हणून नोकरीला लागल्या आहेत. सत्तेचा गैरवापर करून कोणाला लाभ दिला जात असेल, तर हे नियमात बसते, असा सवाल अजित पवार यांनी केला. अनेक मंत्री यात गुंतलेले असल्यामुळेच सरकार हे प्रकरण दडपून त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप करताना अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकार कारवाई करत नाही, त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
तेव्हा परीक्षा घेण्यास अपात्र ठरलेल्या कंपन्यांना पुन्हा पात्र करून टीईटी परीक्षा घेण्यात आल्याने हा घोटाळा झाला. त्यामुळे हा घोटाळा कोणी केला वा अपात्र कंपन्यांना पात्र करण्याची दुरुस्ती कोणी केली, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
विरोधकांचे आरोप फेटाळताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पाठराखण केली. टीईटी घोटाळयावरून अब्दुल सत्तारांवर आरोप करण्यात येत आहेत. पण त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागलेली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे. पण कोणत्याही मंत्र्यांवर बेछूट आरोप करून निघून जायचे, असे प्रकार सध्या सुरू आहेत. बाहेर माध्यमांच्या समोर बोलून आरोप करायचे, हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. पण आम्ही विषय अर्धवट सोडणार नाही, इशारा फडणवीस यांनी दिला.