( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई- गोवा महामार्गावरील मानसकोंड येथे दुचाकी आणि स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वा. च्या सुमारास घडली होती. या अपघातात प्रफुल्ल गोनबरे (२०, परचुरी, वेल्येवाडी, संगमेश्वर), ओंकार गुणाजी भोसले (२२, मानसकोंड फेपडेवाडी, संगमेश्वर), विनायक विश्वनाथ चव्हाण (३५, रसांताक्रूझ मुंबई, स्वीफ्ट कार चालक) असे तिघेजण जखमी झाले होते. या अपघातप्रकरणी परचुरी येथील दुचाकीस्वार प्रफुल्ल विश्वास गोनबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वा. च्या सुमारास प्रफुल्ल गोनबरे हा आपल्या ताब्यातील यामाहा (एमएच ०८. डब्ल्यू ७२२८) घेऊन परचुरी ते वांद्री असा मुंबई गोवा महामार्गावरून जात होता. मानसकोंड येथील शुभम धाब्याच्या पुढे आल्यानंतर कंटेनरला ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाऱ्या स्वीफ्ट डिझायर गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्वीफ्टमधील कार चालक विनायक चव्हाण जखमी झाले. तसेच दुचाकीस्वार प्रफुल्ल हा गंभीर जखमी झाला. त्याच्या गुप्तांगाला मार लागला, तसेच दुचाकीच्या मागील सीटवर बसलेला ओंकार यालाही दुखापत झाली. याबाबतची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार प्रफुल्ल याच्यावर वाहनांच्या नुकसानीस आणि स्वतःसह दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादविकलम २७९, ३३७, ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.