( चिपळूण / प्रतिनिधी )
कोकणातील मुलांनी अथांग समुद्राकडे वळावे आणि रोजगाराच्या संधी म्हणून त्याकडे पाहावे, असे आवाहन मरीनर दिलीप भाटकर यांनी केले.
अलोरे (ता. चिपळूण) येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दिलीप भाटकर हे स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या सुक्या गोदीचे यशस्वी जलावतरण करणारे आणि पश्चिम भारतातील दुसरा शिप ब्रेकिंग प्रकल्प उभारणारे मरिनर आहेत. त्यांचा परिचय करून देताना सूत्रसंचालक संदीप शिंदे यांनी सांगितले की, नौकानयन क्षेत्रात जागतिक पातळीवर वावर असणारे भाटकर मरीन सिंडिकेट कंपनीचे संचालक आहेत. अल् मुर्तडासारखे जहाज समुद्रात फसलेले जहाज बाहेर काढण्यासारखी अनेक कामे त्यांनी केली आहेत. श्री. भाटकर म्हणाले, समुद्र ही कोकणाला लाभलेली मोठी देणगी आहे. पण समुद्र पाहिलेलाही नसलेले दिल्ली, पंजाब, हरियाणातील तरुण कोकणात येऊन काम करतात. कोकणातील तरुण मात्र कोकणाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मुलींना समुद्रावर कामासाठी पाठविले जात नाही. पण सिंगापूर, जपानमध्ये शिपयार्डमध्ये आणि जहाजांमध्येही काम करतात. हाच प्रयोग आपल्याकडे करायचे मी ठरवून १५ वर्षांपूर्वी आयटीआय झालेल्या रत्नागिरीतील काही मुलींना समुद्रावर पाठवले. आता त्या चांगले काम करतात. दिवसभर त्या जहाजावर काम करतात. प्राप्तिकर भरण्याएवढे उत्पन्न त्या मिळवितात. रोजगाराच्या इतक्या संधी असूनही या क्षेत्राकडे कोकणातील मुले वळत नाहीत, याचे वाईट वाटते. समुद्राच्या क्षेत्रात काम करण्यासाठी विशिष्ट शाखेचे शिक्षण घेतले पाहिजे असेही नाही, असे सांगताना त्यांनी अभियंता मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, त्यांच्या जयंतीला १५ सप्टेंबर रोजी इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. पण विश्वेश्वरय्या बीए पास झाले होते. नंतर इंजिनीअरिंगच्या काही पदव्या घेतल्या आणि त्या क्षेत्रात अशी काही भरारी घेतली, की जगभरात त्यांचा नावलौकिक झाला. आपल्याकडेही अभियांत्रिकी किंवा विज्ञानाचे शिक्षण न घेतलेले, अल्पशिक्षित तरुणसुद्धा नाविक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी आंतरराष्ट्रीय जहाज प्रदर्शनाच्या निमित्ताने अर्धा तास भेटता आले. त्या अर्ध्या तासात जगभरातील अनेक परीक्षा पास होऊनही जे ज्ञान मिळाले नाही, ते मला त्या अर्ध्या तासात मिळाले, हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण होता, असे त्यांनी सांगितले. तरुणांनी सकारात्मक मनोवृत्तीने आशावादी होऊन असंख्य संधी असलेल्या समुद्राकडे वळावे. असे आवाहन श्री. भाटकर यांनी शेवटी केले.
समारंभात माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून किरण सावंत, सौ. सुवर्णा मांडके-उपलप (पुणे), अऩिल रायबागी (न्यूयॉर्क) यांनी आपले विचार मांडले. या शाळेत घालविलेला काळ सोनेरी काळ होता. सहशैक्षणिक अनेक उपक्रमांमध्येही शिक्षकांमुळेच सहभागी होता आले. शरीर सुदृढ होण्यासाठी शिक्षक व्यायामही करून घेत. शाळेतील वाचनालयामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. आजचे विद्यार्थी पुढच्या जीवनात एखाद्या क्षेत्रात यशस्वी होतील, तेव्हा शिक्षकांचे हे परिश्रमत जाणवतील. अशा विविध भावना या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
समारंभाला सीए वसंतराव लाड, संस्था उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक गायकवाड, प्राथमिक शाळेच्या सुरुवातीच्या काळातील शिक्षिका प्रज्ञा नरवणकर, ‘माझी अलोरे शाळा’ हे सुवर्णमहोत्सवी गीत लिहिलेले आणि गायिलेले शिक्षक चंद्रकांत राठोड, माजी शिक्षक श्री. रामचंद्र खोत, अरुण माने, जयसिंग सकपाळ, शंकर गायकवाड, मच्छिंद्रनाथ वाटेकर, पालक प्रतिनिधी सिद्धी शिंदे, दीपक कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक विभागाचा विशेष विद्यार्थी सर्वेश विघ्नेश जाधव, सान्वी बाबू शिंदे आणि उत्कर्ष विजय तांबट यांचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी केलेले स्वागत विशेष ठरले.
*तुळशीच्या रोपांसह निघाली शेतकरी वृक्षदिंडी*
स्वागतयात्रेअंतर्गत शाळेच्या शिशुविहार आणि प्राथमिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली शेतकरी वृक्षदिंडी निघाली. प्रामुख्याने तुळशीच्या रोपांसह अन्य रोपे असलेल्या पालखीचे पूजन झाल्यानंतर त्या पालखीची वृक्षदिंडी दिलीप भाटकर, सीए वसंतराव लाड आणि अन्य मान्यवरांनी पालखी वाहिली. शाळेच्या सध्याच्या इमारतीतून सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना झाली. पालखी त्यानंतर मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम’चा प्रारंभ झाला. बालगोकुलम अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळण्यात मुले दंग झाली. तेथे कृष्ण, सुदामा आणि त्यांचे सवंगडी पोषाखात पोह्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला. याचवेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोळकेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. सुरेखा बोलाडे, उपसरपंच श्रीकांत निगडे व कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, उपसरपंच संदीप कोलगे, पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.