(अलोरे / चिपळूण)
पुण्यातील प्रख्यात गायिका ‘संगीत अलंकार’ दीपाली इनामदार-देशपांडे यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय आणि सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाची दमदार सुरुवात झाली. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २६) सायंकाळी माजी विद्यार्थिनी असलेल्या दीपाली इनामदार-देशपांडे यांच्या गायकीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, सौ. शुभदा भागवत, स्कूल कमिटी चेअरमन विठ्ठल चितळे, दीपाली देशपांडे यांचे पती मनीष, आगवेकर सरांचे ज्येष्ठ पुत्र अमित, सीए वसंत लाड (दुबई), चिपळूणमधील ओंकार संगीत साधनेचे सौ. व श्री. सतीश कुंटे, सौ. अमृता आठवले-आगवेकर, अलोरे शाळेचे समन्वयक अरुण माने, अनिल गणपत्ये, रामचंद्र खोत, कमलाकर शेलार, संजय भागवत (सातारा) हे माजी विद्यार्थी आणि स्वप्नील चांदिवडे, नितेश चव्हाण, अश्विनी खेडेकर, गणेश कदम, रंजना झोरे, ज्योती शिंदे हे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी शाळेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुवर्णमहोत्सवाच्या सांगता समारंभाला अनेक जुने विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यामुळे शाळेच्या काजूच्या झाडांना चंदनाचा सुगंध प्राप्त झालेला आहे, असे ते म्हणाले. अध्यक्ष हेमंत भागवत यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळेही शाळेच्या लौकिकात भर पडल्याचे सांगितले. जुनी शाळा, जुन्या आठवणी, तेव्हाच्या मित्रमैत्रिणी, तेव्हा झालेली शिक्षा, खेळ आणि विविध सन्मान या साऱ्यांचीच मनात गर्दी झाल्यामुळे भारावून गेल्याची भावना सौ. दीपाली देशपांडे यांनी व्यक्त केली.
उद्घाटनानंतर मैफलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी सौ. देशपांडे यांचा परिचय करून देण्यात आला. विवाहानंतर दीपाली मनीष देशपांडे असे नाव झालेल्या पूर्वाश्रमीच्या दीपाली श्रीपाद इनामदार यांचे माध्यमिक शिक्षण अलोरे शाळेत झाले आहे. माध्यमिक शिष्यवृत्तीधारक म्हणून त्यांनी सुयश संपादन केले होते. त्या १९८४ ते १९८७ या काळात अलोऱ्याला वास्तव्याला होत्या. त्यांचे वडील कोयना प्रकल्पात अधिकारी, तर आई शिक्षिका होती. सौ. देशपांडे यांचे अकरावी व बारावीचे शिक्षण नाशिकला, इंजिनीअरिंगचे शिक्षण साताऱ्यात झाला. त्या संगीत विशारद आहेत. गानसभा-पुणे या संस्थेमार्फत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीत मैफली दीपालीताई सादर करतात. पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेत त्या गेली १२ वर्षे गणित आणि भौतिकशास्त्राचे १२ वर्षे अध्यापन करत आहेत. जगभरातील संगीत साधकांना त्या गायनाचे ऑनलाइन मार्गदर्शन करतात.
आपल्या शिक्षणाची झलक त्यांनी अलोऱ्यातील आजच्या मैफलीत दाखवून दिली. प्रासादिक शैली असलेल्या भीमपलासी रागात विलंबित झपतालात निबद्ध बडाख्याल आणि त्याला जोडबंदिश म्हणून ख्यालनुमा तराणा दीपाली यांनी सादर केला. दोन्ही रचना संगीताचार्य माधुरी डोंगरे यांच्या होत्या. निरंजन ॐ निर्गुण निराकार असे त्याचे बोल होते. त्यानंतर २०१७ सालातील शाळेचा आणि सतीश कुंटे सरांचा विद्यार्थी पवन मोहिते याने दरबारी कानडा राग आणि नंतर अबीर गुलाल हे गीत सादर केले. त्यानंतर दीपाली यांनी गुरूचे महत्त्व सांगणारे राजस्थानी लोकसंगीतातील ‘गुरू पैय्या लागो हे भजन, मिला दे शाम सुंदर मोहे आज आणि तू राम नाम जप’ ही भैरवी सादर केली.
दीपाली यांना संगीत साथ करणारे नागावे येथील ॲड. शशिकांत पिरदनकर, ओंकार शिर्के, अमेय भिडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. देवकी खोत यांनी केले.