(रत्नागिरी)
भारतीय राज्यघटनेत समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य सांगितले गेले आहे, आपला उद्देश देखील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे हा आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक रवींद्र खानविलकर यांनी केले.
पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल गयालवाडी आणि जागुष्टे हायस्कूल कुवारबाव येथे नुकतेच कोकण विभाग आयोजित अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराच्या प्रात्यक्षिकांसह व्याख्यान पार पडले. प्रत्येकाला वयक्तिक समस्या भेडसावत असतात, अशावेळी आपण बुवा-बाबा, मांत्रिक, तांत्रिक, भगत, यांच्या आहारी न जाता त्याऐवजी विज्ञानाच्या मार्गाने गेल्यास अंधश्रद्धेचे अज्ञान दूर होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केल्यास भूत, भानामती, करणी बाबा बुवांच्या चमत्कारातील फोलपणा लक्षात येतो.
श्रद्धा असावी मात्र ती अंध नसावी. फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे प्रत्येक प्रात्यक्षिक हे विज्ञानावर अवलंबून असते. म्हणूनच युवापिढीने या भोंदू बाबांच्या शोषणाविरुद्ध लढा देऊन सर्वसामान्य माणसांची सुटका केली पाहिजे व सर्वसामान्यांच्या मध्ये तार्किक विचार करण्याची जागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन रवींद्र खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र खानविलकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष जगन्नाथ साबळे व सुशील पवार आदी उपस्थित होते.