राज्यात कोरोना व्हायरसचा हाहाकार वाढत असतांना, कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राकडून करण्यात येत असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधतांना सांगितले आहे. कोरोना काळात घरातच राहून काम करत असल्यामुळे, विरोधकांकडून होणारी टीकेची झोड आणि एकंदर परिस्थितीची जाणिव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी, आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या चिमुकल्यांच्या पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी राज्यातील जनतेला धीर दिला आहे. लहान मुलांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला पाळा आणि चिमुकल्यांवर घरीच कोणतेही औषध देऊन उपचार करु नका, असे महत्त्वाचे आवाहन त्यांनी केले. कोरोना काळातील संकटांचा आढावा घेत राज्य शासन सर्वतोपरी पावले उचलत असून, नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केले, तसेच यापुढेही करणार अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनाच्या संकटाची तीव्रता पाहून, लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत आपली कटुपणा घेण्याची तयारी आहे असे म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. राज्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची आपली तयारी असल्या म्हणत त्यांनी लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत असल्याची वस्तुस्थिती सर्वांपुढे मांडली आहे.