(नवी दिल्ली)
आयसीसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने दिल्लीत अटक केली. व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जात अनियमितता केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०११ दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला सुमारे १८७५ कोटींचे कर्ज दिले होते. मात्र या आर्थिक व्यवहारांत गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. २०१७ मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले होते.
CBI has arrested former MD & CEO of ICICI bank Chanda Kochhar & Deepak Kochhar in the alleged ICICI bank – Videocon loan fraud case
(File Picture) pic.twitter.com/I7kmu09pjE
— ANI (@ANI) December 23, 2022
याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र, सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून २०१८ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचे सीईओपद सोडावे लागले होते. बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या नियमबा कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असे सांगण्यात येते. या प्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयने २२ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा नोंदविला आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने जानेवारी २०१९ मध्ये चंदा कोचर यांना पदावरून हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच त्यांचे एप्रिल २००९ ते मार्च २०१८ या कालावधीत मिळालेला ७.४ कोटी रूपयांचा बोनस परत करण्याचे आदेश देत त्यांचे अन्य आर्थिक भत्तेही रोखण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर २०१८ मध्ये आपण लवकर निवृत्ती घेत असल्याचे बँकेला कळवले होते. त्यानंतर कोचर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली होती.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांची चौकशी करत अटक केली होती. त्यानंतर चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामीनावर बाहेर होते. त्यातच आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.