(मुंबई)
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे यांच्या आरोपांमुळे दिशा सालियन प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असतानाच आता नारायण राणे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाला डिवचले आहे.
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या आहे, ही माझी ठाम भूमिका आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही हत्याच आहे असा पुर्नोच्चार नारायण राणेंनी केला. तर शिवसेनेत आता पुरुष शिल्लक नाही असा हल्लाबोलही नारायण राणे यांनी केला आहे. ठाकरें सत्तेत असताना दिशा सालियान प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशाची आत्महत्या नाही, तर हत्याच आहे. हे पहिल्या दिवसापासून सांगतोय. अडीच वर्षे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नाही तर आदित्य ठाकरेंना काही व्यक्तीनी घटनास्थळी पाहिले आहे. हे जे आदित्य ठाकरेंचे नाव येत आहे ना, त्यावेळी ते तिथेच उपस्थित होते. या प्रकरणी एसआयटीचे जे कोणी प्रमुख असतील, त्यांच्याकडे माहिती देईन, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावाने फोन आल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल ‘AU’ नावानं आले असल्याची माहिती शेवाळेंनी संसदेत बोलताना दिली. ‘एयू’ (AU) म्हणजे, आदित्य उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली. आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाबाबत सूचक विधान केले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नागपुरात बोलत असताना एकनाथ शिंदेंनी तसे संकेत दिले आहेत. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, मी त्याची माहिती घेऊन बोलतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर सत्ताधारी शिंदे गटातील नेत्यानेच आदित्य ठाकरेंवर आरोप केल्याने आता राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.