(मुंबई)
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या मराठी कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘इन गुड फेथ’ या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या ‘सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाच्या साहित्य अकादमीच्या वार्षिक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या `उजव्या सोंडेच्या बाहुल्या` या कादंबरीला पुरस्कृत करण्यात आले आहे. कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे अकादमीचे सचिव डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱया, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही डॉ. राव यांनी सांगितले. मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या या निवड समितीने या वर्षीच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत.