(मुंबई)
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाने जबर झटका दिला आहे. खासदार राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळला. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वॉरंटलाही स्थगिती देण्यास नकार
शिवडी न्यायालयाचा निर्णय सत्र न्यायालयाने कायम ठेवतानाच शिवडी न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचे सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. राणा यांनी शिवडी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. शिवडी न्यायालयानेही नवनीत यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता.