रा. प. महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर साध्या गाड्या घेण्याच्या निर्णयास एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ठाम विरोध दर्शवला आहे. या खासगी गाड्यांचे पार्किंग व मेंटेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीच्या जागा दिल्या जाणार आहेत. जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. हे गंभीर आहे. या संदर्भात संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे व सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी परिवहनमंत्री तथा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्र पाठवले आहे.
महामंडळ खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतुकीसाठी 500 साध्या गाड्या (लालपरी) भाडेतत्त्वावर घेणार असल्याची बातमी आहे. खासगी वाहतूकदारांच्या बसेसला नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा निश्चित करून त्या जागेचा नकाशा व क्षेत्रफळ यांची माहिती 48 तासात तातडीने सादर करण्याच्या लेखी सूचना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसारितही केल्या. याशिवाय 300 ते 400 व त्यापेक्षा जास्त किमी अंतराच्या चालनात असलेल्या नियताची माहितीही मध्यवर्ती कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. याला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विरोध दर्शवला आहे.