रत्नागिरी जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरे, गोठ्यांसह इमारतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 6 हजार 766 घरांचे सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत तर 370 गोठ्यांचे 25 लाखाचे नुकसान झाले. महसूल यंत्रणेकडील पंचनाम्यानुसार नुकसानीचा आकडा पाच कोटीच्या घरात गेला आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून, 8 व्यक्ती जखमी झाल्या. मृत पशुधनाची संख्या 11 आहे. जिल्ह्यात 17 घरे पूर्णतः बाधित झाली असून, अंशतः बाधित घरांची संख्या 6 हजार 766 आहे. त्यात सर्वाधिक दापोलीत 2235 आहेत.
रत्नागिरी तालुक्यात 1084 तर राजापुरातील 891 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या जिल्ह्यातील 370 इतकी आहे. वेगवान वान्यामुळे 1 हजार 42 झाडे पडली. चक्रीवादळात 59 दुकाने व टपन्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यातील 3 हजार 430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे. बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीजखांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्च दाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीजखांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णतः तर 65 बोटींचे अशंतः नुकसान झाले. 71 जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 90 लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहेत. अंदाजे 1 कोटी98 लाख 84 हजारापेक्षा अधिक नुकसान आहे.