(नवी दिल्ली)
भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. हा बहुमान तब्बल २१ वर्षांनी भारतात परतला आहे. या स्पर्धेत जगभरातील ६३ देशांतील महिलांनी सहभाग घेतला होता. यात सरगम कौशलने बाजी मारली. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी सरगम व्यवसायाने शिक्षिका आहेत. तिने २०१८ मध्ये भारतीय नौदलाच्या अधिका-याशी लग्न केले. जम्मू-काश्मीरमधील ३२ वर्षीय सरगम कौशलने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले. सरगमने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि पती यांना दिले.
मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. मुकुटाच्या क्षणाची एक झलक इथे शेअर करताना लिहिले आहे की, दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. हा मुकुट २१ वर्षांनंतर परत आला आहे. सरगमपूर्वी २००१ मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी हा किताब जिंकला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. यापूर्वी सरगमने १५ जून २०२२ रोजी मिस इंडिया वर्ल्ड २०२२ चा पुरस्कार जिंकला होता. त्यांना ही पदवी नवदीप कौर यांनी दिली होती.
मिसेस वर्ल्ड ही जगातील पहिली अशी सौंदर्य स्पर्धा आहे, जी विवाहित महिलांसाठी बनवण्यात आली. याची सुरुवात १९८४ मध्ये झाली. पूर्वी स्पर्धेचे नाव मिसेस अमेरिका होते, जे नंतर मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असे बदलले गेले. १९८८ मध्ये याला मिसेस वर्ल्ड असे नाव देण्यात आले.