(नवी दिल्ली)
लोकसभेत बोलताना खा. सुळे यांनी महाराष्ट्रासह देशभरात लम्पी आजारामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे दुग्धव्यवसायही अडचणीत आला आहे, असे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. लम्पी आजारामुळे देशातील शेतक-यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळे अशा शेतक-यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचार व्हायला हवेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली.
लम्पी आजारामुळे शेतक-यांंचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली तर जवळपास तीस लाख जनावरांना लागण झाली आहे. या आजारामुळे दुग्धव्यवसाय करणा-या शेतक-यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे या शेतक-यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये ३ लाख ५४ हजार २४७ पशूंना संसर्ग झाला आहे. त्यापैकी २ लाख ७१ हजार ४६५ पशू उपचाराने बरे झाले आहेत. मात्र, २४ हजार ७६७ पशूंचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईपोटी जनावरांच्या मालकांना २९ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. १ कोटी ३९ लाख ४७ हजार पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे.