रत्नागिरी जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहिम शासकीय संस्थांमार्फत सुरु आहे. काही खाजगी रुग्णालये यांच्याकडूनही कोवीड लसीकरण केंद्रासाठी मागणी होत आहे. या संदर्भात ज्या खाजगी दवाखान्यांमध्ये कोवीड लसीकरण केंद्र सुरु करावयाचे आहे. त्यांनी लसीकरण केंद्रासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे अर्ज करा. मात्र त्यासाठी शासन निर्देशानुसार आवश्यक त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून एका परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
कोविड लसीकरण केंद्रासाठी तीन वेगवेगळ्या खोल्या आवश्यक आहेत. त्यात प्रतिक्षालय, लसीकरणासाठी खोली, लाभार्थ्यांना विश्रांतीसाठी खोली ठेवावी लागेल. प्रतिक्षालयात सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असून हात धुण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. लसीकरण कक्षात टेबल, खुर्ची, हबकटर व बायोमेडिकल वेस्ट साहित्य गरजेचे आहे.
लसीकरणानंतर लाभार्थी 30 मिनीटे निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी पुरेशी जागा, तसेच साहित्य दर्शविणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रावर चार अधिकारी, पाच नर्स, इंटरनेट सुविधा, तत्काळ उपचारासाठी साहित्य ठेवणे गरजेचे आहे. अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी असेल तर खाजगी दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरु करता येईल. रुग्णालयांनी इमेलवर अर्ज पाठवण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.