(चिपळूण)
नाक दाबताच तोंड उघडते…ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, तसेच घडले. शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी १५ डिसेंम्बर पासून आंदोलनाचा इशारा देताच मंगळवारी संबंधित ठेकेदार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी चिपळूणमध्ये दाखल झाले. बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता सुरू झालेले काम बंद होणार नाही, असे आश्वासन ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संदीप सावंत यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या दिवशी काम बंद पडेल त्याच दिवशी आंदोलन सुरू होईल असा थेट अल्टीमेंटम यावेळी त्यांनी दिला आहे.
चिपळूण बुरुमतळी येथील मध्यवर्ती एसटी स्टँड हायटेक करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सुमारे ४ कोटींचा निधी मंजूर करून दिला होता. चिपळूणचे एसटी स्टँड सर्वसुविधायुक्त आणि हायटेक असावे ही त्यांची संकल्पना होती. त्यानुसार भूमिपूजनचा सोहळा ही पार पडला. एसटी स्टँडची जुनी इमारत देखील जमीनदोस्त करण्यात आली. नंतर कामही सुरू झाले. परंतु सर्व काही नव्याचे नऊ दिवस असेच झाले. जोत्याचे काम होताच काम बंद पडले ते आज तागायत बंद आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिपळूण शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी प्रवाशी आणि सर्वसामान्य नागरिकांची दखल घेत याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला. परंतु नवीन ठेकेदार देखील नव्याचे नऊ दिवस ठरला. थातुरमातुर काहीतरी करून त्याने देखील काम बंद ठेवून पोबारा केला. त्यामुळे पुन्हा एकदा काम रखडले.
अखेर शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनीच आवाज उठवला आणि १४ डिसेंम्बर पर्यंत एसटी स्टँडचे काम सुरू झाले नाही तर १५ डिसेंम्बर रोजी कोणतीही कल्पना न देता गुरे, कुत्री, मांजर तसेच शेकडो शिवसैनिकांना बरोबर घेऊन एसटी स्टँडच्या मधोमध आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा दिला होता. ही मात्रा जबरदस्त लागू पडली, जणू धावाधाव झाली. मंगळवारी संबंधित ठेकेदार व एसटी महामंडळाचे अधिकारी चिपळूणमध्ये दाखल झाले. प्रथम त्यांनी पाहणी केली नंतर संदीप सावंत यांच्या बरोबर प्रदीर्घ बैठक ही घेतली.
कारणे अनेक…
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काम रखडल्याबाबत अनेक कारणे समोर ठेवली. पण हा दोष सर्वसामान्य प्रवाशांचा नाही. तुम्ही पूर्वीची स्थानक इमारत का तोडली…? आता प्रवाशांनी कुठे जायचे…? उन्हात, पावसात भिजत राहायचे का…? तुमच्याकडे निधी नाही…?अंदाजपत्रक जुने आहे…? परडवत नाही…मग ठेका घेतला का…? कोणतीही कारणे नको… काम सुरू करता की उद्या आंदोलन सुरू करू…?अशा प्रश्नांची सरबत्ती करत संदीप सावंत यांनी अक्षरशः घाम फोडला.
बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आता काम सुरू करत आहोत. आता थांबणार नाही असे आश्वासन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दिले. ज्या दिवशी काम थांबेल त्या दिवशी आंदोलन सुरू होईल. मग “शेंडी तूटो वा पारंबी” मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत संदीप सावंत यांनी १५ डिसेंम्बरचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. बुधवारी सकाळी स्वतः पाहणी करणार तसेच रोज कामावर लक्ष ठेवणार. ज्या दिवशी काम बंद त्याच दिवशी आंदोलन सुरू होईल,अशी माहिती बैठकीनंतर संदीप सावंत यांनी यावेळी दिली आहे.