(ज्ञान भांडार)
रेल्वेने संपूर्ण भारतात आपले जाळे विणलेले आहे. लांबच्या प्रवासासाठी अनेक जण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेमार्फत अनेक प्रयत्न केले जातात. अनेकदा रात्री प्रवासादरम्यान कळत नकळत सहप्रवाशांकडून त्रास सहन करावा लागतो. यासाठी आता रेल्वेने नियमांत बदल करत पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी हे नियम बनवले आहेत. प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रात्री १० वाजल्यानंतर रेल्वेत जोरजोरात गाणे वाजवाल, मोठ्या आवाजात गप्पा माराल तर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी काही प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो, त्यांची झोपमोड होते. या तक्रारींची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासही सुरूवात झाली असून संबंधित प्रवाशावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही नियम मोडले तर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. तिकीट चेंकिंग स्टाफ, टीईटी, कोच अटेंडंट, मॅनेजमेंट स्टाफ, टीसी यांनाही याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेत लांब पल्ल्याच्या गाडीत रात्री १० नंतर फोकस लाईट वगळता सर्व इतर लाईट बंद करण्यात याव्यात असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.