(मुंबई)
मोठ्या जल्लोषात आणि गाजवाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण केलेल्या हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. यामध्ये दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जेथे लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तेथून जवळच मार्गाच्या एंट्री पाईंटवर हा अपघात झाला आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. दोन्ही कारचालकांनी सामंजस्याने तोडगा काढल्याने याची पोलिसात तक्रार झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासंदर्भात अनेकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे लोकार्पण होताच अनेक वाहनचालक लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी शिर्डी-औरंगाबादच्या दिशेने मोठ्या प्रमाणात निघाले.
महामार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने टोल नाक्यावर मोठी रांग लागली होती. त्यातच आज समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच म्हणजे वायफळ टोलनाक्याजळच हा पहिला अपघात झाला. एका कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने टोलनाक्याजवळ धडक दिली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली. दोन्ही वाहनचालकांनी वाद न वाढवता सामोपचाराने तोडगा काढला. धडक देणाऱ्या कारचा समोरच्या बाजुचा चक्काचूर झाला होता.