(गुहागर)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था नवीन असताना व सहकार क्षेत्रातील परिपूर्ण अभ्यास नसतानाही चार वर्षात एक कोटी वीस लाख स्वनिधी व सुमारे आठ लाखाचे भागभांडवल उभे करून सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावातून प्रचार आणि प्रसार करत सभासद संख्या वाढवून जनमाणसामध्ये विश्वास निर्माण केला.
गतवर्षात सलग चार वर्ष पतसंस्थेचा अ वर्ग राखत व शून्य टक्के एनपीए राखत पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. पहिल्या वर्षांपासून सभासदांना लाभांश देणारी ही पतसंस्था असून थकबाकीचे प्रमाण सलग ४ वर्षे अत्यल्प ठेवणारी पतसंस्था म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच विक्रमी वसुलीची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी झालेली पतसंस्था, सोनेतारण कर्जव्यवहात १००% वसुली करणारी पतसंस्था, कर्ज व ठेवी यांच्या आदर्श प्रमाणात राहून ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देणारी पतसंस्था, CR/AR चे कमीत कमी आवश्यक असलेले ९% चे प्रमाण १९.५४ % पर्यंत असणारी ही पतसंस्था आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.चा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२ कोकण विभागातून गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये प्रथम क्रमांकाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अल्पावधीतच यदिपस्तंभ पुरस्कार या पतसंस्थेला प्राप्त झाला आहे.
पतसंस्थेचा पारदर्शक व्यवहार पाहता सहकार खात्याकडून संस्थेला शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखा मंजूर झाल्या आहेत. यापैकी शृंगारतळी शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता शृंगारतळी येथील प्रतिष्ठान सोन्या-चांदीचे व्यापारी जय गुहागरकर यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता शरद गुहागरकर यांच्या शुभहस्ते उत्साहात उद्घाटन पार पडले. यावेळी सौ. वृषाली गुहागरकर, जयशेठ गुहागरकर पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे, सर्व संचालक मंडळ सदस्य, समन्वय समिती सदस्य, कर्मचारी वृंद, समाजातील अनेक मान्यवर व समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक संचालक,कर्मचारी वर्ग व सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
लवकरच येत्या काही दिवसांत संस्थेची दुसरी शाखा दाभोळ येथे सुरु करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केला. संस्थेच्या एकंदरीत प्रगतीचा चढता आलेख व संचालक, प्रशासन अधिकारी व समन्वय समितीच्या कामकाजाबाबत उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.