(नाणीज/वार्ताहर)
नाणीज येथे नव्याने सुरू झालेल्या आठवडा बाजाराचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते करण्यात आले. आता दर रविवारी हा बाजार येथील ग्रामपंचायतीजवळ भरणार आहे.
येथे आठवडा बाजार नसल्याने लोकांची, विशेषतः महिलांची गैरसोय होत होती. या बाजारामुळे ती दूर झाली आहे. बाजारामुळे नाणिजच्या व्यापाराला चालना मिळेल. वेगवेगळे भाजी विक्रेते किंवा इतर व्यापारी, मासे विक्रेते नाणीज मध्ये येतील. यापूर्वी बाजारासाठी फक्त करंजारी आणि पालीवरच अवलंबून राहावे लागत होते. आता नाणीज व परिसरातील लोकांना जवळच हक्काचा बाजार उपलब्ध झाला आहे. येथे स्वस्त दराने भाजी आणि इतर वस्तू उपलब्ध होतील. यामुळे लोकांचा प्रवास खर्च व वेळ वाचेल.
यावेळी मंत्र्यांचे छोटेखानी भाषण झाले. नाणीजच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाजाराचे उद्घाटन झाल्यानंतर श्री सामंत यांनी बाजारात फेरफटका मारून व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
सुरुवातीला नाणीजचे सरपंच गौरव संसारे, ग्राप सदस्य विनायक शिवगण यांनी बाजार सुरू करण्याची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी सरपंच दत्ताराम शिवगण, उपसरपंच राधिका शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तालुकाप्रमुख बाबू महाप, विभाग प्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल शेठ सावंत, गणेश सुवारे, विद्या बोंबले, विघ्नेश कोतरे, यांच्यासह ज.न.म. संस्थानाचे सीईओ विनोद भागवत, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम खावडकर, अशोक (आबा) सावंत, नाणीजचे खोत राकेश सावंत, विलास बेर्डे, चोरवणे येथील सरपंच कांबळे, नाणीज शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी सुधीर कांबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.