( खेड / प्रतिनिधी )
कर्ज फेडण्यासाठी चुलतीने पुतण्याला विश्वासाने दिलेले लाखो रुपयांचे दागिने परत न करत परस्पर हडप केल्याची घटना खेड शहरातील वाणीपेठ येथे घडली. याप्रकरणी चुलतीने पुतण्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रसाद भालचंद्र कांबळे (२९, रा. वाणीपेठ खेड)असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या पुतण्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शहरातील वाणीपेठ येथे मातृ छाया इमारतीत वास्तव्य करणाऱ्या शीतल राजेंद्र कांबळे यांचा पुतण्या प्रसाद भालचंद्र कांबळे (२९, रा. वाणीपेठ खेड) याने ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ तोळे वजनच्या सोन्याच्या पाटल्या व ५ तोळे वजनाचे सोन्याचा हार तसेच त्यांच्या पतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट व त्यांच्या सासुचा एक ५ तोळे वजनाचा सोन्याचा हार असे लाखो रुपयांचे दागिने शितल यांनी आपल्या पुतण्याला कर्ज घेण्यासाठी दिले.
प्रसाद याला फॅक्टरी टाकावयाची असल्याने राजवैभव पतसंस्थेत हे दागिने तारण ठेवुन कर्ज काढले होते. ते कर्जप्रसाद कांबळे याने ऑक्टोबर २०२२ मध्ये फेडुन हे दागिने सोडवुन शितल यांना परत देणे गरजेचे होते. हे सोन्याचे दागिने प्रसाद कांबळे याला शितल यांनी विश्वासाने दिले होते, परंतु दागिने प्रसाद याने परत न देता स्वतःकडे ठेवुन दागिन्याचा अपहार केला.