( संगमेश्वर / प्रतिनिधी )
तालुक्यातील तांबेडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी एकूण चार उमेदवार रिंगणात असून खुल्या प्रवर्गातील असलेल्या या पदासाठी चक्क एका उच्चशिक्षित स्त्रीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आजपर्यंत राजकारणातील हेवेदावे, उट्टे काढण्याच्या दृष्टीने अनेक उमेदवार एका पदासाठी उभे केले जातात. तसेच स्त्री उमेदवार ही केवळ स्त्री राखीव पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे आपण ऐकले असेल, मात्र यावेळी चक्क पुरूषांना तेही खुल्या गटातून आव्हान देणारी ही संगमेश्वरची आर्यन लेडी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
राजकारणाचे तंत्रशुद्ध शिक्षण देणार्या राज्यशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या या महिलेचे नाव सौ.ललिता रोहित तांबे असे आहे. त्यांचे पदव्युत्तर हे साहित्य आणि भूगोल या विषयांमधून झाले आहे. तसेच पीएचडीचे शिक्षण सुरू असल्याचे समजते.
कोकणासारख्या दर्या-खोर्यांच्या मागासलेल्या भागात भूगोलसारख्या विषयाचे उत्तम ज्ञान असणारी आणि राज्यशास्त्राचे शास्त्रीय शिक्षण घेतलेली व सध्या डॉक्टरेटचे उच्चशिक्षण घेत असलेल्या सौ.तांबे यांच्या उमेदवारीमुळे तांबेडी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पक्ष पाठिंबा जाहीर करत असताना देखील प्रबळ आत्मविश्वासाने राजकारणात सक्रीय झालेल्या या महिलेने कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेतला नाही उलटपक्षी खुल्या प्रवर्गातून पुरूषांसाठी सामना करण्याचे आव्हान तिने स्वीकारले आहे. उच्चशिक्षित पदवीधर असलेल्या सौ.तांबे यांच्या उमेदवारीमुळे गावातील अनेक स्त्रियांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे चित्र दिसत आहे. केवळ महिलाच नाहीत शिक्षणाला महत्त्व देणार्या तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांनी देखील चेहरा नवा, बदल हवा म्हणत शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाची माहेरवाशीण असलेल्या सौ.तांबे यांना उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिल्याचे ग्रामस्थ आवर्जुन सांगतात. यामुळे अनेकांचे पक्षीय राजकारणाचे अंदाज बदलण्याची शक्यता असून आपली सुत्रे बिघडतात की काय? असे देखील उरल्यासुल्या विरोधकांना वाटू लागल्याचे चित्र दिसत आहे. ज्यांच्या उमेदवारीचे चिन्ह ‘शिट्टी’ हे ग्रामीण भागात फार पूर्वीपासून प्रचलित असल्याने अनेकांना परिचित आणि बहुजन चळवळीच्या जवळचे असल्याचे मानले जाते.