(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बहाण्याने रत्नागिरीतील प्रौढाची 7 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 13 जून 2018 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. एज्युकेशन ओव्हरसिज कन्सल्टन्सीचा मालक सागर साळवी (रा. नवपाडा ठाणे) असे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात जगन्नाथ रमाकांत जुवळेकर (53, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जगन्नाथ जुवळेकर यांच्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यासाठी त्यांनी ठाणे येथील एज्युकेशन ओव्हरसिज कन्सल्टन्सीचा मालक सागर साळवीच्या खात्यात 6 वर्षांची 18 लाख रुपये फी जमा केली. परंतु सागर साळवीने त्यातील फक्त अडीच वर्षांची फी वैद्यकीय कॉलेजला भरून उर्वरित 7 लाख रुपयांची फसवणूक केली.
याबाबत जुवळेकर यांनी सागर साळवीला फोनद्वारे वारंवार विचारणा केली पण सागरने पैसे देण्यास टाळाटाळ केली. म्हणून जुवळेकर ठाणे येथील सागरच्या ऑफिसला गेले असता तेही बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.