गावाचं कितीही विस्तारीकरण अथवा काळाच्या ओघात नवं रुप आल असल, तरी गावाचं गावपण ‘ग्रामदैवते’ मध्येच सामावलेले असते. प्रत्येक कोकणी माणूस ग्रामदैवताला आवर्जून नतमस्तक होत असतो. रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ‘श्री देव भैरी’ हे त्यापैकीच एक अपार श्रध्दास्थान असलेले ग्रामदैवत.
श्रीदेव भैरव हे शंकराचंच एक रुप. कोकणातील शंकराच्या मंदिराप्रमाणे या मंदिराची रचना असून उतरत्या छपरावर, मातीची कौले आजही मंदिराचं जुनंपण टिकवून आहेत. मुख्य मंदिरात कालभैरवाची सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सुरेख अशी चतुर्भुज मूर्ती आहे. श्रीदेव भैरी मंदिराचा सभामंडप भव्य असून त्या मंडपात १२ खांब आहेत. हे १२ खांब म्हणजे १२ वाडयांमधील १२ मानक-यांचे प्रतीक मानले जातात. भैरीबुवाच्या या मंदिरात तृणबिंदुकेश्वर आणि जंबुकेश्वर पंचायतन, हरतालिका, विष्णू, गणपती यांचीसुद्धा मंदिरे आहेत. कालभैरवाची वेगवेगळी अनेक रुपं असून त्याला ‘काशी क्षेत्राचा कोतवाल’ म्हणून ओळखलं जातं. श्री कालभैरव हा अष्टभैरवांपैकी एक देव असल्याचं मानलं जातं.
रत्नागिरीच्या बारा वाडयांवर श्री देव भैरीची मेहेरनजर असून गावातील भक्तांना सुखी-समाधानी ठेवण्याचं काम श्रीदेव भैरी आज साडेतीन शतकांपेक्षा जास्त काळ करत आहेत. संपूर्ण कोकणातल्या शिमगोत्सवात ‘श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव’ वैशिष्ठ्यपूर्ण व अभुतपूर्व समजला जातो. शिमगोत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी फुलून गेलेला असतो. शिमगोत्सवावेळी पालखीतील विराजमान ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या वर्षातून एकदा वाजतगाजत श्रीदेव भैरीच्या भेटीला येतात. ही देवतांची होणारी भेट अंगावर रोमांच आणणारी असते. भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवतात. अभुतपूर्व असा हा क्षण अनुभवण्यासाठी मुंबई-पुणेसारख्या मोठ्या शहरातील भाविक मोठया भक्तीभावाने शिमगोत्सवाला हजेरी लावतात.
समस्त रत्नागिरीकरांचं श्रीदेव भैरव हे श्रद्धास्थान असून विविध धार्मिक उत्सव येथे मोठय़ा भक्तीभावाने साजरे केले जातात. सामाजिक एकात्मतेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही या देवस्थानाचा उल्लेख होतो. श्रीदेव भैरीबुवांची पत्नी समजली जाणारी श्री जुगाईदेवी जवळच झाडगावात स्थानापन्न आहे. भैरीबुवांच्या उत्सवप्रसंगी या देवीलाही विशेष महत्त्व असतं.
श्री कालभैरव हे रत्नागिरीचं ग्रामदैवत असल्याने इथल्या भाविकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. आपले ग्रामदैवत नवसाला पावते अशी लोकांची धारण आहे. या देवाच्या कृपाछत्राखालीच आपला योगक्षेम सुखाने चालतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
रत्नागिरीच्या भैरी मंदिरात भजन, कीर्तन, पूजा असा जन्मोत्सवाचा पारंपरिक कार्यक्रम असतो. रत्नागिरीतल्या बारा वाडयांचे मानकरी या उत्सवाला जमतात. या उत्सवात त्यांचे मान-पानही काढले जातात. भैरीबुवा हा रत्नागिरीचा रखवालदार असल्यामुळे इथला प्रत्येक माणूस या उत्सवात सामील होतो.
मन भाराऊन टाकणारा येथील परिसर शांत व निसर्गरम्य आहे. रत्नागिरीकर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीदेव भैरीचे दर्शन घेऊनच करतात. रत्नागिरी शहरात खालच्या आळीत असणाऱ्या या देवस्थानाला रिक्षासह कोणत्याही वाहनाने सहज पोहचता येते.