(खेड / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर नजीकच्या घाटात इर्टिका कार दरीत कोसळून चालकासह 6 जण जखमी झाले. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर आहे, तर इतर 5 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालक सतीश जगताप (कुर्ला-मुंबई) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. तर दीपाली कर्नाळे (65), दामोदर कर्नाळे (70), साक्षी कर्नाळे (42), स्वराज कर्नाळे (12), राजेश कर्नाळे (38) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चालक सतीश जगताप हा इर्टिगा कारमधून 5 जणांना घेवून घाटकोपरहून येत होता. धामणदिवी दत्तवाडीनजीक कारवरील त्याचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस कार खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात वरील 6 जण जखमी झाले. पोलादपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.