(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील खरवते मधलीवाडी येथे आजाराला कंटाळून प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्यायल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली. सुरेश केशव चौगुले (55, खरवते मधलीवाडी, राजापूर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद 5 डिसेंबर रोजी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चौगुले यांना 8 वर्षापासून अंगाला खाज येत असल्याचा आजार होता. या आजारावर मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र या आजाराला कंटाळून 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सुरेश चौगुले यांनी राहत्या घरी खरवते येथे गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यांना उलटया सुरु झाल्यानंतर सारा प्रकार निदर्शनास आला. लगेचच त्यांना उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच 29 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपासून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.