(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होणार असल्याने, त्या अनुषंगाने कोकणातील महत्त्वाच्या नाचणी पिकाचे आहारातील पोषक महत्व मोठय़ा प्रमाणात असल्याने रब्बी उन्हाळी हंगामामध्ये नाचणी या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्यास आर्थिक फायदा होण्यास मदत होईल. यासाठी कृषि विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी कोंडगाव कशेळी येथे केले.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी तालुक्यातील कोंडगाव कशेळी येथे शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. त्यांच्या कृषि आणि संलग्न बाबी विषयी अडचणी,समस्या जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, फळपीक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजने बाबत माहिती देऊन गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे कृषि विभागाच्या वतीने आवाहन केले.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी जयेश काळोखे यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, आंबा फळमाशी नियंत्रणसाठी कमी खर्चात रक्षक सापळा बनवणे व त्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक रघुनाथ डवरी यांनी कृषि यांत्रिकीकारण योजनेची माहिती दिली. कृषि सहाय्यक सुनील कुरंगळ यांनी काजू फळपीक व्यवस्थापन, म. ग्रा.रो. ह. यो. फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी आत्मा अंतर्गत रब्बी हंगाम मिश्र भाजीपाला प्रात्यक्षिकचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले. यावेळी गावचे सरपंच दीपक बावकर, पोलीस पाटील प्रकाश बावकर, कृषि सहाय्यक सुषमा कदम आणि शेतकरी उपस्थित होते. यानंतर दत्ताराम ताम्हणकर यांचे मसूर पिकाचे प्रक्षेत्र, प्रकाश बावकर यांचे भाजीपाला लागवड प्रक्षेत्राची पाहणी केली. खानू येथे प्रगतशील शेतकरी गुंडू पाटील यांचे भाजीपाला, काजू, पेरू प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली आणि कृषि विभागाचे योजनांबाबत माहिती देण्यात आली.