(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील भरणे समर्थनगर येथील तरुणाला लाईटबील अपडेटच्या नावाखाली 46 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आदेश अनंत भोसले (38, समर्थनगर, भरणे, खेड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद खेड पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. ही घटना 3 डिसेंबर रोजी सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश भोसले याच्या व्हॉटस्अॅप नंबर एका अनोळखी व्यक्तीने मेसेज केला. गेल्या महिन्याचे लाईटबील अपडेट न केल्यामुळे तुमची वीज रात्री 9.30 वा. तोडण्यात येणार आहे, असा मेसेज आला. आपली वीज कट होवू नये असे वाटत असेल तर एनीडेस्क अॅप डाउनलोड करा असे सांगितले. त्यानंतर पेंडिग बिल भरण्यासाठी फोन येवू लागले. शेवटी एनीडेस्क अॅप डाउनलोड केल्यानंतर लगेचच 48 हजार 600 रुपये अकाउंटरवरुन लंपास झाल्याचे आदेश याला दिसले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आदेश याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर महिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.