(मानसिक संतुलन – भाग ४)
पन्नाशीच्या आसपास असलेली एक बाई त्या दिवशी अचानक योगवर्गाला आली. ओळखीची होती, परंतु बऱ्याच वर्षांनी आली. “सर मला काही बोलायचे आहे तुमच्याशी” अशी म्हणाली. मी तिला बसवले. विचारपूस केली. सगळे बरे आहेत ना? विचारले.” नाही हो, मला बरेच वाटत नाही. छातीमध्ये धडधड होते. दम लागतो. खूप भीती वाटते, अचानक जीव जाईल की काय असे वाटते. माझ्याच नशिबी का हो हे” असे म्हणून ती रडू लागली. Depression ची प्राथमिक लक्षणे तिच्यात स्पष्ट दिसत होती. मी तिचे सारे ऐकून घेतले. ती खूप घाबरली होती. तिच्याशी बोलून तिला शांत केले. वर्गाला जॉइंट व्हायला सांगितले. दुसऱ्या दिवसापासून ती रोज येऊ लागली. रोज ती प्रश्न विचारी, ” मी बरी होईन का हो सर?” मी हो म्हणे. योगाची विविध तंत्रे, त्यात लक्ष एकाग्र करणारी, स्वतःबद्दल जागृती वाढवणारी, श्वासावर नियंत्रण आणणारी, रिलॅक्स करणारी अशी ना ना योग तंत्रांचा वापर करून तिला अंतर्मुख केले. दोन महिन्यात ती ५०% शांत झाली. आसनांमधील तालबद्धता तिला जमू लागली. चेहरा खुलला. हसू लागली. Depression मधून ती अलगद बाहेर पडली.
जर वेळेवर ती आली नसती तर….? खोल मानसिक तणावात ती गेली असती. मग पुढे काय झाले असते ते सांगायला नकोच. अशी अनेक माणसे आपल्या अवतीभवती वावरतांना दिसतात. नेमके काय करावे त्यांच्यासाठी हे आपल्यालाही माहीत नसते. कमी-अधिक तणाव हा प्रत्येकाला असतोच. तो असायलाच हवा. परंतु त्याचे प्रमाण वाढू नये म्हणून आपण प्रयत्न करायचा असतो. योग त्यासाठी चांगली मदत करतो..
Depression चे महत्वाचे कारण म्हणजे जीवनात कोणतीही आशा न उरणे किंवा जगण्यासाठी काही कारण शिल्लक न राहणे होय. सामान्य माणसाच्या आयुष्यात अशी निराशा का येते? जीवन जगण्याचे गणित येवढे चुकण्याचे कारण काय? लहानपणी व युवांच्या बाबतीत येणारी निराशा आपण मागील दोन लेखातून पाहिली.
जन्मताच विशिष्ट विचार धारण करून प्रत्येक माणूस आपले अस्तित्व टिकवुन असतो. ज्या विचारांवर त्याची जीवन इमारत उभी असते तीच ढासळली की तो कोसळतो. म्हणून ह्या विचारांच्या इमारतीचा पाया पक्का करायला हवा. मुळात जे विचार मनुष्य लहानपणी धारण करतो त्या विचारातच काहीतरी चुकते. हे आपण पाहिले. विशिष्ट हेतूसाठी मनुष्याचा ह्या जगात प्रवेश होतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जन्मासोबतच त्यास विशिष्ट स्वभाव प्राप्त होतो. त्या स्वभावास अनुसरून आणि त्याच्या संचित कर्मानुसार त्याच्या सभोवतालच्या जगातील माहिती आपल्या पंच ज्ञानेंद्रियांतून तो आत्मसात करीत जातो. ह्या अनुभवांचा त्याच्या अंतर्मनास जे ज्ञात होत जाते ते सर्व सत्यच असते असे नाही. आणि हीच महत्त्वाची गोष्ट त्याच्या निदर्शनास कुणी आणून देत नाही. हे कार्य, पुढे त्याच्या सुदैवाने त्याचे गुरुजी मिळाले तर ते त्यास याबाबत जागरूक करतात. तोपर्यंत त्याच्यासमोर जे जे उपस्थित होत जाते त्यासच तो सत्य मानीत जातो. जन्मानंतर व्यक्तीस जे विशिष्ट व्यक्तिमत्व प्राप्त होते त्यास योग शास्त्रात *धर्म* असा शब्द आहे. वरवर दिसणाऱ्या या मानसिक तणावाची सुरवात कुठेतरी खोल झालेली असते. ती शोधण्यासाठी योगशास्त्रात काही संकल्पनांचा उल्लेख आढळतो. त्यातील एक संकल्पना म्हणजे भाव होय. जसा धर्म हा पुरुषार्थ मानला जातो तसा थोड्या वेगळ्या अर्थाने त्यास भावही म्हणतात.
योगशास्त्रात चार भावांचा उल्लेख आहे. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य भग्द्वतगीतेमध्येही याचा उल्लेख आहे. तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो.
श्रेयान्स्व धर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ||३-३५||
आपल्या नैमित्तिक कर्मात दोष शोधून इतरांच्या कार्याची स्तुती करणे योग्य नाही. दुसऱ्यांची कार्यपद्धती आत्मसात करण्यापेक्षा आपल्यास भावणारे कार्य करतांना मृत्यू येणे श्रेयस्कर ठरते.
इथे धर्माचा अर्थ हिंदू , मुस्लिम,ख्रिश्चन असा होत नाही. धर्म हा शब्द “धॄ” ह्या धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ धारण करणे असा आहे. मनुष्य जेव्हा देह धारण करतो त्या देहाबरोबरच काही गुणही धारण करून येतो. तो त्याचा पिंड असतो. त्या पिंडा नुसार त्याचे उत्तरदायित्व, कर्तव्य, विचार, व कर्मपद्धत ठरत असते. त्यायोगे त्याने ईश्वराची उपासना करायची असते. त्याच्या अस्तित्वाची हीच मोठी ओळख असते. प्रत्येक जण आपल्यामधील एक विशिष्ट गुण शोधेल तर तो यशाचे नक्कीच शिखर गाठील.
वरील पिंडानुसार तो क्रोधी, संयमी किंवा प्रेमळ अशा एका किंवा अनेक गुणांनी युक्त होतो. त्या गुणांचा योग्य पद्धतीने विकास करून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावायचा असतो. अशावेळी लोकांच्या दृष्टीने दुसरा कितीही श्रेष्ठ वाटत असला तरी त्याचे आपण अनुकरण करू नये. तसे केल्यास त्याच्या मूळ पिंडाचे नुकसान होते. आपण वास्तवात जसे आहोत त्यालाच मुख्य आधार मानून आपली प्रगती करायला हवी. मदत ही बाहेरून नाही आतून येते. रामायणातील रावण किंवा महाभारतातील दुर्योधन ही वाईट व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जातात. तरीही त्यांना गृहीत धरल्याशिवाय रामायण किंवा महाभारत पूर्ण होत नाही.
जेव्हा आपल्या प्रकृतीनुसार किंवा पिंडानुसार आपले वर्तन किंवा कर्म जाते त्यावेळी आपली सर्व इंद्रिये, मन, आणि बुद्धी यांमध्ये सामंजस्य निर्माण होते. व आपल्या हातून अद्भुत कार्य घडते. मात्र तसे न झाल्यास अध्यात्मिक उन्नती मध्ये बाधा निर्माण होते. व आपले व्यक्तिमत्व कोलमडते. ते पूर्णत्वाने विकसित होत नाही. मात्र याउलट आपल्या पिंडाला जपल्यास आपला आत्मविकास योग्य दिशेने होण्यास मदत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भरत जाधव, नाना पाटेकर हे सिनेकलाकर होत. ह्या कलाकारांनी आपल्या स्वतःच्या पिंडाला न्याय दिला. जनमानसात आपल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप उमटवली आणि आज ते नटांचे शिरोमणी बनून राहिले आहेत.
थोडक्यात काय तर आत्महत्या करणाऱ्यांचा नीट अभ्यास केल्यास त्यांनी अशापद्धतीने स्वतःस महत्व न देता इतरांशी स्वतःची तुलना केली, किंवा त्यांच्यासारखे बनण्याची चेष्टा केली, अपेक्षा केली. आणि हा प्रसंग ओढवून घेतला असे म्हणता येईल. आजही सामान्य युवक स्वतःची तुलना इतरांशी करतो. व नाराज होतो.
अधिकतर माणसे ही सामान्य विचारांची असतात. वरील प्रमाणे बाह्य जगतास प्रमाण मानून ती आपल्या जीवनास आकार देण्याचा प्रयत्न करीत राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन चाकोरीबद्ध बनते. समाजाने जे काही परंपरागत नियम बनवलेले असतात त्यातच ते बद्ध राहतात. त्याचा परीणाम असा होतो की ही माणसे सतत भीती, दडपण, असुरक्षितता याखालीच जगत राहतात.
सामान्य माणसाची दिनचर्या ठरलेली असते. शहरातील जीवन तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत असते. ना मागे ना पुढे. त्यामुळे चालता बोलता निसर्गातील एक अद्भुत असा आविष्कार जो माणूस, तो निर्जीव मशीन सारखा गरागरा फिरत राहतो. म्हणायला जिवंत, मात्र सभोवताली निसर्गात व स्वतःच्या शरीरामध्ये जे बदल होत असतात ते त्याच्या लक्षातच येत नाहीत. खेळणारे बागडणारे हे शरीर कधी वृद्ध झाले ते कळतच नाही. विविध रोगांनी शरीरात गर्दी केल्यावर कुठेतरी दुखते आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, चालायला होत नाही अशी जाणीव होते. तेव्हा कुठे तो भानावर येऊ लागतो. स्वतःकडे लक्ष द्यायचे राहूनच गेले. कशासाठी ह्या जगात आलो होतो आणि काय करून बसलो असे म्हणून कपाळावर हात मारून घेतो. मागे वळून जाता येणे शक्य नसते. आता फक्त पुढेच. पण पुढे तर काहीच आशा दिसत नाही. पूर्ण अंधार किंवा पूर्णविराम! अशावेळी मन प्रचंड निराशेकडे झुकते. तसे प्रौढ किंवा उतार वयात जीवाचे बरेवाईट करून घेण्याची काहीच गरज नसते. परंतु जीवनाविषयी चुकीची धारणा आणि प्रचंड आसक्ती यामुळे निर्माण झालेली असहायता, त्यास वेगाने मृत्युकडे नेते.
जसजसे वय पुढे सरकते…
१) तसतसे मन शांतीच्या दिशेने वाटचाल करायला हवे.
२) त्यासाठी आपल्या सभोवताली आपल्याला अनुभवास येणाऱ्या क्षणांना नीट समजून घेऊन त्यामागील नश्वरता किंवा दुःखाची जाणीव व्हायला हवी.
परंतु आपण काय पाहतो …
१) जसजसा माणूस वयाने वाढत जातो तसतसा त्याच्या नात्यांचा गोतावळा तो वाढवत नेतो.
२) अनेक भौतिक गोष्टींचा तो संग्रह करीत जातो.
३) त्या सर्वांच्यात तो अधिकाधिक भावनिक दृष्ट्या गुंतत जातो.
४) शारीरिक ताकद कमी झाली की त्या गरजा इतरांनी पूर्ण कराव्यात अशीही अपेक्षा करीत राहतो.
५) त्यातून परवलंबित्व व असहाय्यता वाढत जाते.
अशा पद्धतीने शारीरिक आणि भावनिक गरजा जेवढ्या इतरांवर अवलंबून राहतील तितका निराशेचा व पुढे जाऊन डिप्रेशन चा धोका वाढत जातो.
त्यासाठी मनुष्याने …
१) जीवनाचे मूलभूत ज्ञान आपल्या आयुष्यात लवकरात लवकर प्राप्त करून पुढील आयुष्य स्वावलंबी कसे होईल याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे.
२) इथे स्वावलंबी याचा अर्थ पैशाने नव्हे तर समजुतीने असा आहे. तसे झाले की आपल्या मूळ पिंडाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होऊन स्वतःचा उद्धार होईल व आपले जीवन इतरांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
(पुढील लेखात मानसिक तणाव अधिक वाढू नये म्हणून काय करावे ते पाहूया)