( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील रिक्षा व्यावसायिक तरुणाचा मुंबई येथे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार 1 डिसेंबर रोजी सकाळी घडली. शहानवाज महंमद हुसैन ठाकूर (54, उद्यमनगर, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शहानवाज यांच्या अपघाती मृत्यूने रत्नागिरीतील रिक्षा चालकांनी हळहळ व्यक्त केली.
सविस्तर वृत्त असे की, शहानवाज ठाकूर हे कामानिमित्त पनवेल येथे आपल्या वॅगनार गाडीने गुरुवारी गेले होते. मात्र पनवेल येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी रत्नागिरी शहरात परिसरात रिक्षा व्यावसायिकांनी हळहळ व्यक्त केली.
शाहानवाज ठाकूर हे मनमिळावू स्वभावाचे होते. ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असत. त्यामुळे त्यांची अनेकांशी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनानंतर रत्नागिरी तालुक्यातील रिक्षाचालक-मालक तसेच बहुसंख्य लोक त्यांच्या दफनविधीसाठी सैतवडे गावात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहानवाज यांच्या निधनाने त्यांचे मित्र, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जमीर खलपे यांनी शोक व्यक्त केला. एक सामाजिक कार्यकर्ता व सर्वांना आपलासा वाटणारा मित्र, भाऊ आपण गमावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुले असा परिवार आहे.