(मुंबई)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई शहराशी खूप जवळचे नातं होते. डॉ. आंबेडकर यांनी मुंबई राहून अनेक सामाजिक उपक्रम, राजकीय चळवळी केल्या. महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची MTDC तर्फे बसने मोफत सफर आयोजित करण्यात आली आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ असं या टूरचे नाव असून या दौऱ्यामध्ये चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ आणि सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाणार आहे.
मुंबईत आल्यावर बाबासाहेब सुरूवातीला परळ येथील बीआयटी चाळीत २२ वर्ष राहिले होते. त्यानंतर दादरमध्ये बांधलेल्या ‘राजगृह’ या भव्य बंगल्यात ते रहायला गेले होते. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अशी अनेक ठिकाणं मुंबई शहरात आहे. मुंबई शहरातील या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे ३, ४, ७ आणि ८ डिसेंबर रोजी मोफत बस फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे.
या मोफत बस फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना सकाळी ९ वाजता दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथे एकत्र जमायचे आहे. पर्यटकांना बसने चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर बीआयटी चाळ क्र. १ खोली क्र. ५०/५१ येथे नेण्यात येईल. या दौऱ्याची सांगता फोर्ट भागातील सिद्धार्थ कॉलेज येथे होईल.
सहलीसाठी दररोज ४ बसेस धावणार आहेत. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ आधारावर या बस फेरींमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटक फोनद्वारे नोंदणी करू शकतात. मुंबईत होणाऱ्या या मोफत सहलीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 7738375812 ( विक्रम) किंवा 7738375814 (रसिका) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.