( गुहागर / प्रतिनिधी )
तालुक्यातील नवानगर येथे शुल्लक कारणावरुन प्रौढावर धारदार चाकूने वार करुन जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चिंतामणी पुणाजी जांभारकर (52, मच्छिमार, रा. नवानगर रोहीलकरवाडी, गुहागर) असे जखमी झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. सचिन यशा आंबेरकर (नवानगर, वणकरवाडी, गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी जांभारकर व सचिन आंबेरकर हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत. 1 डिसेंबर रोजी चिंतामणी जांभारकर हे नेहमीच्या कामासाठी नवानगर येथील जेटीवर गेले होते. तेथे अंजनवेल येथील जेटीवर काम करणारा सचिन आंबेरकर दिसला. यावेळी चिंतामणी जांभारकर यांनी सचिन याला तू इथे कामासाठी कसा आलास असे विचारल्याचा राग आल्याने सचिन याने शिवीगाळ करत मच्छिमारांची जाळी शिवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार चाकूने जांभारकर यांच्या छातीवर वार केला. यामध्ये जांभारकर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर जांभारकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सचिन आंबेरकर याच्यावर भादविकलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.