मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने गुरुवारी झारखंडच्या निलंबित प्रशासन अधिकारी पूजा सिंघल यांची ८२.७७ कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता तात्पुरती जप्त केली. ईडीने कारवाई केलेल्या त्यांच्या या मालमत्तांमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर आणि दोन भूखंडांचा समावेश आहे. झारखंड पोलीस आणि दक्षता ब्युरोने दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने केलेल्या चौकशीत पूजा सिंघल यांनी मनरेगा घोटाळ्यातील रक्कम नातेवाईकांच्या विविध बँक खात्यांमध्ये कमिशनच्या स्वरूपात जमा केल्याचे तपासात पुढे आले आहे. याच प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.
सिंघल या १६ फेब्रुवारी २००९ ते १९ जुलै २०१० दरम्यान खुंटीच्या भागाच्या उपायुक्त म्हणून नियुक्त होत्या. ५ मे ला ईडीने पूजा सिंघलच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. त्यानंतर इडीने त्यांना अटक केली. ईडीने पूजा यांचे पती अभिषेक कुमार झा, चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार सिंह, खुंटी जिल्हा अभियंता आणि अधिकारी राम बिनोद प्रसाद सिन्हा, जय किशोर चौधरी, शशी प्रकाश आणि राजेंद्र कुमार जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
पूजा सिंघल यांचे लग्न जून २०११ मध्ये झाले होते, या लग्नापूर्वी बेकायदेशीरपणे कमावलेली रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा करत असत. पण लग्नानंतर तिने ही रक्कम पतीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. पूजा सिंघलचा जन्म डेहराडूनमध्ये झाला आहे. डेहराडूनच्या गढवाल विद्यापीठातून तीने पदवी संपादन केली आणि त्यानंतर केंद्रीय सेवा आयोगाची तयारी सुरू केली. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी पूजाने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवले होते.