(रत्नागिरी/प्रतिनिधी)
कोकण रेल्वेमार्गावरून 30 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी पहिली कंटेनर ट्रेक रत्नागिरीतून थेट मुंबईतील जेएनपीटी बंदर अशी धावली. या ट्रेनमध्ये वातानुकूलित कंटेनरमधून थेट मालवाहतूकीचा बुधवार 30 नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. येथील मासळीसह अन्य निर्यातयोग्य उत्पादनांचा व्यापार वाढवण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कृषी व उद्योग क्षेत्राकडून या सेवेचे स्वागत करण्यात येत आहे.
रत्नागिरीतून थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही कंटेनर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या वातानुकूलित कंटेनर ट्रेनमधून उद्घाटनाच्या पहिल्या फेरीत 250 मेट्रीक टन प्रक्रियायुक्त मासळी पाठवण्यात आली. 11 कंटेनर्स बुधवारी उद्घाटनाच्या दिवशी रत्नागिरीतून रवाना झाले.
या ट्रेनला व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक संतोषकुमार झा, दीपक गद्रे, विभागीय व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून जेएनपीटीकडे रवाना करण्यात आली. या ट्रेनला 11 कंटेनर जोडलेले आहेत. या ट्रेनद्वारे येथील गद्रे कंपनीत प्रक्रिया केलेली मासळी जेएनपीटीमधून अमेरिका व युरोपला निर्यात होणार आहे. रत्नागिरीतून ही ट्रेन 8 ते 10 तासात जेएनपीटी बंदरात पोचणे अपेक्षित आहे.