(कोल्हापूर)
मनसेच्या दिपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे हे तीन नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरील या दिपोत्सवात राज ठाकरेंसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विशेष उपस्थित राहिल्याने महायुतीच्या चर्चांना हवा मिळाली. त्यानंतर हे तीनही पक्ष एकत्र येणार अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र भाजप, मनसे व शिंदे गटाच्या महायुतीबाबतच्या चर्चांना राज ठाकरेंनीच पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरेंनी कोल्हापूर दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबतच्या शक्यता फेटाळत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढवणार, असे सांगितले. राज ठाकरेंनी केलेल्या घोषणनेंतर मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानंतर सुरू झालेल्या महायुतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.