(लांजा)
लांजा येथील महिलाश्रमातील अडीच वर्षाच्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोन महिलांना दोषी मानून न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरेखा शांताराम बिजीतकर (32, लांजा शेट्येवाडी), संगिता अनिल पवार (41, लांजा रखांगी चाळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन महिला आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, 27 फेब्रुवारी 2020 रोजी लांजा येथील महिला आश्रमात एका 6 वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या बाळाला लादीवर आपटल्याने मृत्यू झाला होता. हे प्रकरण लांजात मोठ्या प्रमाणात गाजले होते. बाळाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सुरेखा बिजीतकर या लांजा येथील महिला आश्रमात अधीक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर संगिता या काळजीवाहक म्हणून काम पाहत होत्य़ा. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरेखा बिजीतकर व संगिता पवार यांच्याविरूद्ध भादंवि कलम 304 (अ), 337 व बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास लांजा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्र्वेता पाटील यांनी केला. त्यांनी न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केल़े होते.
खटल्यादरम्यान 11 साक्षीदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आल़े. न्यायालयाने दोन्ही महिलांना दोषी मानून 3 वर्ष सश्रम कारावास व 7 हजार 500 रूपयांचा दंड सुनावला. ही शिक्षा अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी दिली. सरकारी पक्षाकडून ऍड़ मेघना नलावडे यांनी युक्तीवाद केल़ा. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नरेश कदम यांनी काम पाहिल़े.