( खेड / प्रतिनिधी )
तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील तरुणाने कर्जाचे हप्ते थकल्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महेश कृष्णा हंबीर (38, कळंबणी बु. हंबीरवाडी, खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह मृतदेह महिनाभरानंतर कुजलेल्या स्थितीत दिसून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हंबीर याने कर्ज काढून टेम्पो घेतला होता. मात्र बँकेचे कर्जाचे हप्ते थकले होते. यातून नैराश्य आलेला महेश 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वा. घरातून निघून गेला होता. घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेऊनही सापडला नाही. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2022 रोजी खेड पोलीस स्थानकात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. मात्र 26 नोव्हेंबर रोजी महेश याचा भाऊ शेतात पाणी लावण्यासाठी नदीवर वडाचे रान या ठिकाणी गेला असता महेश याची चप्पल दिसली. त्याने पोलिसांना ही चप्पल दाखवली. त्यानंतर पोलीसांनी परिसराची पाहणी केली असता काजूच्या झाडाला दोरी बांधलेली दिसून आली. मात्र मृतदेह कुजल्यामुळे दोरीच्या खाली हाडे दिसून आली. तिथेच कपडे, पाकिट, बेल्ट, पॅनकार्ड, टी शर्ट, पॅण्ट, रुमाल दिसून आला. यावरुन तो महेश हंबीरचीच हाडे असल्याची ओळख भावाला पटली. नातेवाईकांनी मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी 26 नोव्हेंबर रोजी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे.