मराठी मातीमधील गद्दारी गाडायची असेल, तर जिजाऊंच्या जन्मभूमीतून आशीर्वाद घेण्याचा निर्णय दसरा मेळाव्यात घेतला होता. काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. सत्ता वाचविण्यासाठी दर्शन करत आहेत. गद्दारांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे आणि आशीर्वाद पंतप्रधान मोदींचा पाहिजे. या गद्दार आमदार, खासदारांनी भाजपच्या तिकीटावर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आज (दि. २६) येथे दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकरी संवाद यात्रेची विदर्भातील पहिलीच भव्य जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आज सायंकाळी झाली. यावेळी त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी काँग्रेस सोबत गेलो, तर हिंदुत्व सोडले म्हणताे मग भाजपने जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती महबुबा यांच्यासोबत युती केली होती. त्यावेळी भाजपने हिंदुत्व सोडले नव्हते का?
शिंदे गटाने चिन्ह गोठवलं पण,आम्ही मशाली पेटवल्या आहेत. आता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. आज नवस फेडायला आणि मागील आठवड्यात हात दाखवायला गेले होते, पण तुमचे भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेले आहेत. या गद्दारांना आशीर्वाद घ्यायाला गुवाहटीला जावे लागले आहे, असा टोलाj[ ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. भाजपचे विचार संपले असून भाजप हा पक्ष आहे की, चोर बाजार असा सवाल करून भाजप आयात पक्ष झाला आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
पुढच्या वर्षी कर्नाटकात निवडणुका आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बरळू लागले आहेत. राज्यपालांकडून राज्यातील महापुरुषांचा अपमान सुरू आहे. यावर मिंधे मुख्यमंत्री राज्यपालांवर काहीही बोलत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा आगाऊपण सहन केला नाही. यापुढे महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार खासदार सुप्रिया सुळे यांना शिव्या देतात. मी मुख्यमंत्री असतो, तर लाथ मारून हाकलून लावले असते. ९२ -९३ ला बाबरी मशिद पाडली, तेव्हा तुम्ही बिळात लपले होता, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली.
येथील ताईंना तुम्ही चार पाच वेळा खासदार केले, पण या ताईंनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली आणि ईडीवाले गप्प बसले, अशी टीका ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांचेवर केली. शेतकरी संकटात असताना गुवाहाटीला कसे काय जाताय, राज्य़ात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असे कृषी मंत्री म्हणतायेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता या विमा कंपन्यांची मस्ती उतरविण्याची वेळ आली आहे. खोके सरकार गादीवर बसल्यापासून महाराष्ट्राला पनवती लागली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी वीज बीलमाफीवरून आम्हाला घेरले होते. त्यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ रेकॉर्ड लावून आता त्यांनी वीजबील माफ करून दाखवावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. शिवसेना कितीही फोडली तरी, तुमच्या भरवाशांवर मी उभा आहे. मुख्यमंत्री असतो तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊन दिली नसती. आत्महत्या करू नका, सरकारसोबत लढाईची तयारी ठेवा, शेतकऱ्यांच्य़ा प्रश्नांवर रस्त्यावर उतरा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.