(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते प्रशालेतील सहाय्यक शिक्षक अमित बोले यांनी भारतीय संविधान निर्मिती, भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकूणच व्यक्तींना सर्वांगीण जगण्याचा जीवन मार्ग याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. पुढे बोलताना अमित बोले म्हणाले की,भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान असून या संविधानामुळेच सर्व भारतीय समाजाला चांगल्या प्रकारे जीवन जगता येत असल्याचे आवर्जून उल्लेखित केले. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यासंग, दूरदृष्टी आणि संविधान निर्मितीतील योगदान याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय विचार व्यक्त करताना मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तद्नंतर संविधान दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी १४ वयोगट तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावल्याने विजयी संघ व मार्गदर्शक क्रीडाशिक्षकांचा प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी शाळा व शिक्षण संस्थेच्यावतीने गौरव केला. डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचे मुख्याध्यापक यांनी जाहीर अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिवानंद गुरव यांनी केले.पर्यवेक्षक भूपाल शेंडगे यांनी आभार मानले. यावेळी विचार मंचावर क्रिडाशिक्षक सौ.मनिषा धोंगडे, सहाय्यक शिक्षक केशव राठोड, अरूण कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.