(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड मार्फत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन वर्गाचे आयोजन २५ रोजी करण्यात आले होते.
मासिक पाळीच्या संदर्भात मुलींना भेडसावणाऱ्या समस्या व घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या डॉक्टर मधुरा जाधव यांनी मुलींना मार्गदर्शन केले, तर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या सिस्टर देसाई, सिस्टर हरचेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात खासकरून मुलींना येणाऱ्या समस्या ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत व प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे यांनी केले. तसेच प्रशाला व शिक्षण संस्थेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले. कार्यक्रमाला प्रशालेतील महिला शिक्षिका सौ मोहित, सौ राजवाडकर,सौ गाडे, सौ गंगावणे उपस्थित होत्या.