किरकोळ कारणावरून दारुच्या नशेत एकाचे कुऱ्हा़डीने वार करून पत्नीची हत्या केली. ही घटना मुंबईतील टिटवाळ्याजवळील आपटी गावात घडली. एका शेतात रखवालदाराचे काम करणाऱ्या एका दारुड्या पतीने रागाच्या भरात रात्रीच्या वेळी पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. बाळु दुटे (३८) असे आरोपीचे नाव आहे. टिटवाळा पोलसांनी त्याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव उषा दुटे असे आहे.
आपटी गाव परिसरात बिंदुसरा शेतघर आहे. या शेतघराच्या रखवालदारीसाठी मालकाने बाळु दुटे (रा. शेलविरे, अकोले, जि. नगर) आणि त्याच्या पत्नीला शेतघराच्या देखभाल आणि मजुरीसाठी कामावर ठेवले होते.
पती बाळुचे पत्नी उषा (३१) हिच्या बरोबर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत होते. गुरुवारी मध्यरात्री बाळू आणि उषा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. बाळूने दारुच्या नशेत लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. रात्रीच्या वेळी शेतातील घरात ते दोघेच असल्याने उषा यांच्या मदतीसाठी कोणीच आले नाही. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी पती पळून गेला. ग्रामस्थांनी याची सूचना पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात दाखल केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.