(मुंबई)
राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी येण्याचा नवस मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. त्यामुळे आपल्या बाळासाहेबांची शिवसेना गटातील ५० आमदार व मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीत. याचे कारणही गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील उपरोधिक टोला लगावला आहे. पहिल्यांदा जेव्हा आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा संजय राऊत यांनी ४० रेड्यांचा देवीला बळी देणार असं म्हटलं होतं. यावरून टोला लगावताना कामाख्या देवीला ४० रेडे जाणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.