( नवी दिल्ली )
कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान नव्या वादाची भर पडली आहे. बुधवारी (23 नोव्हेंबर) जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फोटोसेशन दरम्यान जर्मन संघाच्या खेळाडूंनी तोंडावर हात ठेवले आणि फिफाचा निषेध नोंदवला. फिफाने ‘लव्ह आर्म बँड’ न घालण्याच्या निर्णयाला जर्मन खेळाडूंनी कडाडून विरोध केल्याचे त्यांच्या या कृतीतून समोर आले आहे.
कतारमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. प्रेक्षकांवर घालण्यात आलेल्या अनेक निर्बंधांनंतर आता एलजीबीटीडब्ल्यू (LGBTW)च्या समर्थनावरून वाद सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू झाल्यानंतर 8 संघांच्या खेळाडूंनी विश्वचषकादरम्यानच्या सामन्यांमध्ये समलैंगिक संबंधांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. तसेच LGBTW समुदायाचे प्रतीक असणारा वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. पण फिफाने याला आक्षेप घेतला. जर एखादा संघ किंवा कोणताही खेळाडू वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरला तर तो फिफाच्या नियमांचा भंग ठरेल आणि अशी कृती करणा-या खेळाडूंवर बंदी घालण्यात येईल असा इशारा फिफाने दिला.
फिफा विश्वचषक स्पर्धा ज्या कतारमध्ये होत आहे तिथे समलैगिक संबंधांवर बंदी आहे. त्यामुळे या जागतिक स्पर्धेदरम्यान नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे फिफाने कठोर निर्णय घेत LGBTW च्या समर्थनार्थ मैदानावर उतरणारे संघ आणि खेळाडूंवर दबाव टाकला. यात जर्मन संघाचाही समावेश होता. अखेर जर्मन संघाच्या खेळाडूंनी फिफाच्या निर्णयाविरुद्ध अनोख्या पद्धातीने आवाज उठवला. तोंडावर उजवा हात ठेवून एक प्रकारे आमचा आवाज दाबला जात असल्याचे या कृतीतून निदर्शनास आणले. जर्मन फुटबॉल फेडरेशनही आपल्या खेळाडूंची बाजू घेतली आणि एक सूचक ट्विट करत जगाचे लक्ष वेधले. ‘ही राजकीय भूमिका नाही, मानवी हक्कांच्या मुद्द्यावर आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. आर्मबँडवर बंदी घालणे म्हणजे आमच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासारखे आहे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडले.