स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या भूमिकेवर ते ठाम असून, ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दरम्यान, त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. आज दि. २३ रोजी सरकारने तातडीने पावले उचलत मदतीची घोषणा केली. परंतु तुपकर यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान राज्य सरकारने याची दखल घेत वाशिम आणि बुलढाण्यातील शेतक-यांसाठी मदत जाहीर केली आहे.
सरकारने दोन्ही जिल्ह्यांत १५७ कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत तुपकर यांनी आंदोलनावर कायम असल्याचे सांगितले. शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे राज्य सरकारसमोरील पेच वाढला आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतक-यांसह आज मुंबईकडे रवाना झाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ते म्हणाले की, सोयाबीनला साडेबारा हजार तर कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.