शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल (दि. २३) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. राबडी निवासस्थानी तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. तेजस्वी यादव यांनी ठाकरे यांना लालूप्रसाद यादव यांच्या चरित्रावर लिहिलेले पुस्तक भेट दिले. या वेळी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई उपस्थित होते.
आदित्य ठाकरे काल दुपारी पाटण्यात पोहोचले. त्यानंतर ते तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी त्यांची आई, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी तेजस्वी यांनी आदित्य ठाकरे यांना शाल आणि लालू यादव यांचे पुस्तक भेट दिले. यावेळी बराच वेळ दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर दोघेही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीसाठी निघाले.
भेटीबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे
मी तेजस्वी यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. मी पहिल्यांदाच पाटणा येथे आलो आहे. उपमुख्यमंत्री यादव यांच्या स्वागताने भारावून गेलो आहे. आमचे वयही जवळपास समान असल्यामुळे तेजस्वी यादव यांच्यासोबत चांगली मैत्री निर्माण होईल. आमचे कौटुंबिक संबंध खूप सलोख्याचे आहेत. आमच्या भेटीमध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आम्ही एकमेकांशी राजकारण सोडून चर्चा केली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. मी तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. तर त्यांनीही मला पुढच्या वेळी इथे दोन ते तीन दिवसांसाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. इथे फॉरेस्ट असेल किंवा पर्यटनाची इतर ठिकाणं असतील तिथे ते मला घेऊन जाणार आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आमची ही चर्चा राजकारणावर नव्हती असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, तसंच या भेटीगाठी यापुढेही होत राहतील असंही स्पष्ट केलं.