(रत्नागिरी)
मिऱ्या -नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम करत असताना कुवारबाव बाजारपेठेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बाजारपेठेतील दुकाने सद्यस्थितीप्रमाणेच राहतील. बाजारपेठेच्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खालून जाणारा अंतर्गत रस्ता तयार करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
ज्या नागरिकांच्या जमिनी महामार्गाकरीता संपादित केल्या जाणार आहेत त्यांना त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, असेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी कुवारबाव बाजारपेठेतील नागरिकही उपस्थित होते.