( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील जेलरोड येथे भरधाव दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अद्वैत प्रकाश जाधव (21, शिपोशी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर स्वतःच्या दुखापतीस आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौरभ नंदकुमार सावंत (35, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्वैत जाधव हा 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या केटीएम दुचाकीवरुन म्हाडवाला बिल्डींग, जेलरोड येथून जात असताना रेवटयावरुन गाडी घसरुन अपघात झाला. या अपघातात अद्वैत याच्या डोक्याला डाव्या बाजूने जोरदार मार बसला. तसेच डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टर प्रभू यांनी तपासून त्यास रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले. त्याला पुन्हा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणले असता 20 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
अद्वैत याने आपल्या ताब्यातील गाडी हयगयीने व भरधाव वेगाने चालवून स्वतःच्या गंभीर अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादविकलम 304 (अ), 279, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.